फुलोरामध्ये अनेक उपक्रम असे केले जातात, ज्यातून मुलंच नाही, तर पालक व शिक्षक सगळ्यांना काहीतरी नवीन शिकायला आणि अनुभवायला मिळतं.
करोना नंतरची फुलोरा
करोनाची झळ कमी झाली आणि गेल्या वर्षी दोनएक महिने शाळा झाली. एरवी कौतुक संमेलन दणक्यात व्हायचे पण शाळेची घडी बसायची होती म्हणून शाळेतच कार्यक्रम बसवले. पाहुणे म्हणून नाट्यकर्मी व मुलांच्यात काम करणारे श्री संजय हळदीकर यांना बोलावले होते. पाहिलीत जाणाऱ्या मुलांचा निरोप समारंभ हृद्य झाला. नाटुकली , नाच ,गाणी असा कार्यक्रम नटला होता. त्याची काही क्षण चित्रे.
Online शाळा
करोनामुळे फुलोरा जवळ जवळ दोन वर्षं बंद असली तरी मुलांचे शिकणे मात्र सुरू होते . पहिले काही आठवडे व्हॅाट्सअपवरून दर आठवड्याचे पाठ मुलांपर्यंत पोचत होते . आमच्या सहकारी भानूताई यांनी संगणक कार्यशाळा घेतली. मुलांसाठी व्हिडिओज बनवणे, गुगल, झूम online सभा घेणे याबाबतचे शिक्षण दिले .आम्ही स्वतंत्रपणे गोष्टी व गाण्यांचेव्हिडिओज बनवले.
त्या निमित्याने आम्ही शिक्षकही मुलांसाठी काही शिकलो. Online फुलोराचे गाणे तयार झाले तो ऑडिओ देत आहे. गीत रचना निमाताई , स्वर नंदिनीताईं आणि सहकारी.
हा प्रार्थनेचा व्हिडिओ ….पहिले नमन .. शब्दरचना, स्वर निमाताई ….
फुलोरा सहल २०१९
३ ते ६ या वयोगटातल्या मुलांना लिहिता वाचता येत नसतं. वेगवेगळे अनुभव घेणं हेच त्यांचं “शिकणं” असतं. अशा विविध अनुभवांपैकी एक अनुभव सहल हा असतो. सर्वानी एकत्रित नव्या ठिकाणी जायचं, वेगळं काही पाहायचं याचा आनंद खूप मोठ्ठा असतो. आपलं गाव माहीत व्हावं म्हणून गेल्या वर्षी मुलांना शाहू जन्मस्थळ म्हणजे “लक्ष्मी विलास” पॅलेस येथं नेलं होतं. त्यावेळेचं बैठं घर, घरासमोरची बाग, त्यांचा कुस्तीचा आखाडा हे सर्व दाखवलं. धरणाची प्रतिकृतीही दाखवली. मुलांना सगळ्यात आवडलं ते त्यांचं भव्य तैलचित्र. दुसऱ्या दिवशीच्या चित्रकलेच्या तासाला बऱ्याच मुलांनी त्या चित्राला स्थान दिलं होतं. अविष्कार आणि चिरंतनी यांच्या वाढदिवसानिमित्त घरी केलेला “केक” मुलांना खायला मिळाला आणि सहल संपन्न झाली.
१) “धरणं” म्हणजे काय हे सुचितामावशीनं मुलांना समजावून सांगितलं
२) “लक्ष्मी विलास” पॅलेसच्या व्हरांड्यात बसलेली मुलं आणि शामलीमावशी आणि नंदिनीमावशी
३) मुलांची चित्रकला

फुलोरा बाजार
“शिकवणं” म्हणजे मुलांना रोजच्या आयुष्याशी जोडणं, परिसरात काय काय चालतं ते समजून देणं होय. “मंडई” ही भाजी वितरण व्यवस्था आहे. तिथलं मनोहारी रंगेबेरंगी वातावरण, ताज्या सुरेख भाज्या, गडबड, गोंधळ विक्रेत्यांच्या आरोळ्या हे सगळं फार मजेशीर असतं. दरवर्षी मुलांना बाजारांत घेऊन जाणं शक्य होतं नाही. मग फुलोरातच मंडई आवतरते. काही पालक स्वतःच्या शेतातली भाजी आणून देतात. बाकी भाज्या मार्केट यार्डातून खरेदी करून बाजार भरतो. भाजी विकताना मुलं किती खूष आहेत हे फोटोंवरून कळतंय ना?
१) घ्या ताजे ताजे कोबी
२) आरोळी ठोकताना विवान
३) पालेभाजी ही आहे बरं !
४) भाज्याच भाज्याच….
सियाचा वाढदिवस
सियाचे पालक हे फुलोऱ्याच्या विचारधारेत न्हाऊन निघालेले! म्हणूनच सियाच्या वाढदिवसाला त्यांनी आजकाल दुर्मिळ झालेला “टांगा” शाळेत आणला. त्यात मुलांना बसवून सैर घडवली. मुलांनी केलेलं भेटकार्ड सियाला मिळालं. किती वेगळी, मजेची मुलांच्या लक्षात राहील अशी भेट सियाच्या आई-बाबांनी दिली. मुलांना हा अनुभव कायम लक्षात राहील. सियाच्या आई-बाबांचं कौतुक!
वासुदेव आला हो वासुदेव आला
फुलोरात सुरवातीला आलेल्या शामलीमावशी खूप मागे मागे असायच्या. त्या आता इतक्या फुलोरामय झाल्यात की विचारू नका. एकदा फुलोरात येतांना त्यांना “वासुदेव” दिसला. कधीमधी मुलांनी तो पाहिला असेल नसेल, पण शामलीताईच्यातला “शिक्षक” जागा झाला. वासुदेवाशी गोड बोलून त्याला चक्क स्वतःच्या स्कुटरवर मागे बसवून घेऊनच त्या फुलोरात अवतरल्या. मुलांनी त्याचा वेगळा पोशाख, त्याची टोपी पाहिली. गाणं ऐकलं, गप्पा मारल्या, भेटी दिल्या. शाब्बास शामलीताई, तुमच्या धाडसाचं कौतुक!
मुंबुबा
“फुलोरा” ही पालक – शिक्षकांनी मिळून चालवलेली बालशाळा आहे. दैनंदिन कामात पालक सहभागी होऊ शकत नाहीत, पण नैमित्तिक उपक्रमात त्यांचा भरघोस सहभाग असतो. या सहभागामुळं त्यांनाही आपलं मूलपण अनुभवता येतं. २०१९ च्या कौतुक संमेलनात मुलांसाठी आई-बाबा पालकांनी व शिक्षकांनी मिळून “मुंबुबा” या संदीप खरेंच्या गाण्यावर बहारदार नाच बसवला. भुतांना पाहून मुलं मुळीच घाबरली नाहीत. उलट सर्वांनीच तो कार्यक्रम उचलून धरला. त्याची ध्वनिचित्रफीत जरूर पहा. राक्षस, भुतं याबद्दलची भीती आपणच मुलांना घालत असतो. त्यांच्याबद्दलच कुतूहल खरंतर योग्यवेळी शमवायला हवं. हे या कार्यक्रमामुळं लक्षात आलं.